कोरोनाचा फटका : जगप्रसिध्द मोटार सायकल कम्पनीने भारतातून घेतला निरोप
टीम : ईगल आय मीडिया
कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केले आणि गेल्या 6 महिन्यात भारतीय उद्योग जगताचा हत्ती खाली बसला. तो आता उठायला तयार नाही, त्यामुळेच अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. अनेक परदेशी कंपन्यांनी आपले भारतातील उद्योग बंद करून पलायन करणे योग्य समजले. हर्ले डेव्हीड्सन ही अशीच एक नामांकित मोटार सायकल निर्मिती करणारी कम्पनी भारतातून आपला कारभार गुंडाळून गेली आहे.
हार्ले डेव्हिडसन ही मोटारसायकल कंपनी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हार्ले डेव्हिडसनची मोटारसायकल, तिचा लुक बाईक वेड्यानाच नाही तर कुणाही सामान्य माणसालाही मोहात पाडेल असाच आहे. मात्र करोनाचा फटका या कंपनीलाही बसला आहे. भारतातून या कंपनीने कारभार गुंडाळला असून त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या ७० कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरीही गमवावी लागली आहे. करोनामुळे लागू केलेल्या लॉक डाऊन काळात विक्री कमी झाल्याने हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतातली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
2019-20 पेक्षा चालू आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने भारतात २५०० पेक्षा कमी मोटरसायकल विकल्या होत्या. भारतातला या कंपनीची ही अगदीच सुमार कामगिरी ठरली. त्यामुळे कंपनीने ७० कर्मचाऱ्यांनाही नारळ दिला आहे. फेब्रुवारी २०१८ या आर्थिक वर्षात हार्ले डेव्हिडसन या कंपनीने ३४०० पेक्षा जास्त मोटारसायकल विकल्या होत्या. मागील काही वर्षांपासून या कंपनीचा चांगला व्यवसाय होता.
हार्ले डेव्हिडसन ही कंपनी इंडियन, बेनेली, कावासाकी, डुकाटी यासारख्या कंपन्यांना टक्कर देतच होती. तसंच यामाहा, सुझुकी आणि होंडा यांच्या प्रिमियम रेंजच्या बाईक्ससोबतही स्पर्धा करत होती. आता ही कंपनी भारतातून गाशा गुंडाळते आहे. त्यामुळे ही देखणी सवारी आता भारतीय रस्त्यावर दिसणे दुर्मिळ होणार आहे.