टीम ईगल आय मीडिया
” अखेरचे भेटून घ्या ” म्हणून नातेवाईकांना बोलावलेले असतानाही ७० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण मरणाच्या दारातून परत आला. मात्र हे दार उघडत असतानाच डॉक्टरनी हातात ठेवले तब्बल ८ कोटी १४ लाख रुपयांचे बिल. त्यावर डॉक्टरांनीच चमत्कारिक मुलगा असे नामकरण केलेल्या या वृद्धाने ” जिवंत राहिल्याचे दुःख सलत राहील ” अशी प्रतिक्रिया दिली.
अमेरिकेतील सिएटल शहरात मायकल फ्लोर या ७० वर्षीय नागरिकास कोरोना लागण झाली म्हणून उपचारासाठी दाखल केले होते. ४ मार्च रोजी स्वीडिश मेडिकल सेंटर येथे दाखल केल्यानंतर मायकल फ्लोर यांच्या हृदय, किडनी, फुप्पुसांवर शस्त्रक्रिया करावी लागली. २९ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि शरीरातील अनेक अवयव निकामी होत होते.
अखेरीस डॉक्टरांनी मायकल फ्लोर यांच्या नातेवाईकांना निरोप देऊन अखेरचे भेटून जा असे सांगितले होते. तरीही मायकल फ्लोर हे जगण्याच्या लढाईत जिंकले. फ्लोर यांच्या लढाऊ, चिवटपणाचे डॉक्टर्सना कौतुक वाटले. त्यांनी फ्लोर यांना चमत्कारिक मुलगा अशी उपाधी देऊन टाकली. मायकल फ्लोर जेव्हा कोरोनामुक्त होऊन घरी जायची वेळ आली तेव्हा हॉस्पिटलने त्यांच्या हातात ८ कोटी १४ लाख रुपयांचे बिल ठेवले. ते बिल पाहून हादरलेल्या फ्लोर यांनी ” जिवंत राहिल्याचे दुःख सलत राहील अशी प्रतिक्रिया दिली. अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील योजनेअंतर्गत या बिलातील काही रक्कम त्यांना माफ होईल मात्र एकूणच बिलाची रक्कम देणे कुणालाही मरणापेक्षा स्वस्त वाटेल.
एकूण तपशील
एकूण बिल ८. १४ कोटी रु ,
दररोज सरासरी ७ लाख रुपये खर्च
२९ दिवस व्हेंटिलेटर , ६२ लाख बिल
हृदय, किडनी, फुप्पुसे यावर उपचार ७७ लाख रु. खर्च