लेबनानमध्ये ७० ठार : ४ हजार जखमी

दोन भयंकर स्फोटाने देश हादरला

टीम : ईगल आय मीडिया

लेबनानची राजधानी बैरूटमध्ये मंगळावारी संध्याकाळी दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले असून तर ४००० जण जखमी झाले आहेत.जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. शहरातील फटाक्याच्या कारखान्यात हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती दिली जात असली तरी अधिकृत कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच हे दोन भयंकर स्फोट झाले. स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील इमारतींच्या काचा फुटल्या. लोकांच्या कानठळ्या बसल्या. शहरांमधल्या रस्त्यांवर धुराचे लोट,गाड्यांवर इमारतींचे अवशेष दिसत होते. रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक लोकं मदतीसाठी वाट पाहत असल्याचे दिसत होते. आधी मृतांचा आकडा ५० तर जखमींचा आकडा २७५० असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून ७० जणांचा मृत्यू तर ४ हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

बंदराजवळच्या भागात झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या मोठ्या परिसराचे नुसान झालं आहे. रेड क्रॉस, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या मोठ्या संघटनांनी तात्काळ मदत करण्याचे आवाहन केलं आहे. लेबनानमधील यंत्रणा आधीच करोना संसर्गाशी दोन हात करत असतानाच या स्फोटामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. प्राथमिक अंदाजानुसार फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागल्याने हे स्फोट झाले. मात्र यावर अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!