जगभरात ७ लाखाहून अधिक कोरोनाचे बळी
टीम : ईगल आय मीडिया
प्रत्येक १५ सेकंदाला १, प्रत्येक तासाला २४७ तर दर दिवसाला ५ हजार ९०० लोकांचा बळी घेत कोरोना विषाणू जगभरात फैलावत आहे. आजवर जगभरात कोरोनाने ७ लाख ५ हजार लोकांचे जीव घेतले आहेत आणि १ कोटी ८७ लाख लोकांना झपाटले आहे. समाधानाची बाब एवढीच कि, १ कोटी १३ लाख लोकांनी कोरोनावर मात केलेली आहे.
२०१९ सालच्या डिसेंबरपासून चीनमधून सुरु झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता जागतिक महामारी झालेला आहे. कोरोनामुळे अमेरिका, ब्राझील देशात हाहाकार माजवला असून भारतातही त्याने १९ लाखाहून अधिक लोकांना शिकार केले आहे. जगभरात कोरोनामुळे ७ लाख ५ हजार जीव गेले आहेत. मानवी मृत्यूचा हा वेग प्रचंड असून दर १५ सेकंदाला १, तासाला २४७ तर दिवसभरात ५ हजार ९०० बळी जाताहेत.
अमेरिकेत ४९ लाख लोकांना कोरोना झाला असून १ लाख ६० हजार बळी गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये २८. ४६ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ९७ हजार ४१८ लोकांचे जीव घेतले आहेत. भारताने या यादीत तिसरे स्थान गाठले असून १९ लाख १० हजार लोकांना लागण झाली आहे तर ३९ हजार ७९५ बळी गेले आहेत.