येमेनमध्ये बॉम्बस्फोट 26 जण ठार

पंतप्रधानांसह मंत्रिमंडळ लँड होताच विमानतळावर बॉम्बस्फोट

टीम :  ईगल आय मीडिया

सौदी अरेबियात निर्वासित राहून येमेनचा कारभार चालवणाऱ्या पंतप्रधानांचे विमान आदेन शहरात नवीन मंत्रिमंडळ घेऊन उतरताच झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 26 जण ठार झाले आहेत आणि 50 पेक्षा अधिक जखमी.या बॉंब स्फोटाने येमेन हादरले असून जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. दरम्यान, पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुखरूप आहेत.

येमेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू असून येमेनचे मंत्रिमंडळ सौदी अरेबियात निर्वासित म्हणून राहत आहे आणि देशाचा कारभार चालवत आहेत. प्रतिस्पर्धी फुटीरतावाद्यांसोबत तडजोड झाल्यानंतर येमेनच्या मंत्रिमंडळात गेल्या आठवड्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान मईन अब्दुलमलिक सईद यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण आदेनला (तात्पुरतं राजधानीचं शहर) परतत होते. त्याचवेळी हा स्फोट घडवण्यात आला आहे.

स्फोटाबाबत सरकारी प्रवक्त्यांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी एका अधिकाऱ्याने माध्यमांना घटनेचा तपशील दिला आहे. घटनास्थळाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून स्फोटाची तीव्रता किती जास्त होती हे स्पष्ट होत आहे. विमानतळावर काही मृतदेह छीन्नविछीन्न अवस्थेत पडल्याचे त्यात दिसत आहेत. हा स्फोट कुणी घडवून आणला याची अद्याप स्पष्टता झालेली नाही.

खबरदारी म्हणून पंतप्रधानांसह सर्व मंत्रिमंडळाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भ्याड दहशतवादी हल्ला असा या घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान मईन यांनी तीव्र शब्दांत हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, येमेनमध्ये अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असलेल्या येथील सरकारला सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे निर्वासित राहून देशाचा कारभार हाकावा लागत होता.

Leave a Reply

error: Content is protected !!