भारतीय मूळ कमलादेवी हैरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार

विद्यमान उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्याशी होणार लढत

टीम : ईगल आय मीडिया

भारतीय वंशाच्या कॅलिफोर्निया सिनेटर कमलादेवी हैरिस अमेरिकेच्या उप राष्ट्रपती पदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील. भारतीय -आफ्रिकन वंशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे कमलादेवी या राष्ट्रपती पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून आघाडीवर होत्या. मात्र नंतर त्यांचे नाव मागे पडले आणि जो बिडेन यांना उमेदवारी मिळाली.
55 वर्षीय कमलादेवी यांचा जन्म कॅलिफोर्निया येथील ओकलांड येथे 1964 साली झाला असून त्यांच्या आई श्यामला गोपालन या भारतीय वंशाच्या आहेत तर वडील डोनाल्ड हैरिस हे जमेका ( आफ्रिका ) वंशाचे आहेत. कमलादेवी या पेशाने वकील आहेत, कॅलिफोर्निया च्या अटर्नि जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
कमलादेवी यांनी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत आणि जो बिडेन यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. जो बिडेन सर्व अमेरिकन नागरिकांना एकत्र आणतील आणि नवीन अमेरिकेला घडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

जो बिडेन यांनी ट्विट करून कमलादेवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तसेच कमलादेवी या अमेरिकेतील सर्वोत्तम नोकरशाह असल्याचे म्हटले आहे.
तर विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कमलादेवी यांच्यावर टीका करताना त्यांची उमेदवारी धक्कादायक असून कामगिरी सुमार असल्याचे म्हटले आहे. त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्याशी होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!