इराणच्या शास्त्रज्ञांची ‘स्मार्ट बंदुकीद्वारे’ ” online ” हत्या

टीम : ईगल आय मीडिया
काही दिवसांपूर्वीच इराणचे सर्वोच्च अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ असलेल्या उपग्रहनियंत्रित स्मॅश हुपर मशीनगनचा उपयोग करण्यात आला होता, अशी माहिती ‘रिव्हलुशनरी गार्ड्स’च्या डेप्युटी कमांडरने दिली.

स्मॅश होपर या बंदुकीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ही बंदूक स्वयंचलित नसून रिमोट कंट्रोलनेही नियंत्रित करता येऊ शकते. त्याशिवाय ही बंदूक लक्ष्याला स्वत: हून स्कॅन करते आणि लॉक करते. बुलेटप्रूफ गाडीमध्येही या बंदुकीच्या गोळीपासून वाचणे कठीण आहे. काही दिवस आधीच इस्रायलच्या एका कंपनीने मॅन पोर्टेबल ऑटोमेटिक बंदूक लाँच केली होती. त्यामुळेच फाखरीझादेह यांच्या हत्येचा आरोप इस्रायलवर लावण्यात येत आहे. ही बंदूक आपल्या लक्ष्याला स्कॅन करते. त्यानंतर दूर बसलेला ऑपरेटर टॅबसारख्या वायरलेस डिव्हाइसच्या माध्यमातून लक्ष्य भेदू शकतो.
अणुशास्त्रज्ञ मोहसेन फाखरीझादेह यांची गाडी २७ नोव्हेंबरला इराणची राजधानी तेहरानच्या बाहेरील महामार्गावरून जात होती. ११ सुरक्षारक्षकांचा ताफाही यावेळी त्यांच्यासोबत होता. यावेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ असलेल्या आणि मिनी ट्रकवर बसवण्यात आलेल्या उपग्रहनियंत्रित मशीनगनने त्यांच्या चेहऱ्याला लक्ष्य करून त्यांच्यावर १३ राऊंड झाडण्यात आल्या, असे रिअर अॅडमिरल अली फादावी यांनी सांगितले.
फाखरीझादेह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्यापासून केवळ १० इंच अंतरावर होत्या. मात्र, त्यांना साधी दुखापतही झाली नाही. मेहर वृत्तसंस्थेने फादावी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ही मशीनगन उपग्रहाद्वारे ‘ऑनलाइन नियंत्रित’केली जात होती आणि लक्ष्य भेदण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला होता, असेही फादावी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राणचे सर्वोच्च अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांच्या हत्येनंतर इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या एका कमांडरला इराणने ठार केले असल्याचे म्हटले जात आहे. या दाव्याच्या पुष्टर्थ एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, इस्रायल अथवा इराण यांनी या हल्ल्याबाबत काहीही भाष्य केले नाही.