30 जण जखमी : काही जण बेपत्ता

टीम : ईगल आय मीडिया
बांगलादेशमधील राजधानी ढाका जवळील नारायणगंज जिल्ह्यात रुपगंजमधील सहा मजली कारखान्याला आग लागली. कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ५२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ३० जण जखमी झाले आहेत. काही जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी प्राण वाचवण्यासाठी कारखाना असलेल्या इमारतीमधून उड्या मारल्या.
गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याचे सांगण्यात आले. कारखाना असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर आग लागली. कारखान्यातील रसायने आणि प्लास्टीकमुळे ही आग इमारतीमध्ये पसरली असल्याचे म्हटले जाते. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जखमी असल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्युन’ने दिले आहे. आगीपासून वाचण्यासाठी काही कामगारांनी इमारतीमधून उडी घेतली.
आगीची घटना समोर आल्यानंतर कामगारांच्या कुटुंबीयांनी कारखान्याबाहेर गर्दी केली होती. बेपत्ता असलेल्या ४४ कामगारांची ओळख पटली असल्याचे वृत्त माध्यमांनी म्हटले आहे.