इसिस ने स्वीकारली जबाबदारी : 13 सैनिकांच्या मृत्यूने अमेरिका संतप्त
टीम : ईगल आय मीडिया
गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर झालेल्या 3 आत्मघाती स्फोटांत 70 जण ठार झाले असून, किमान 140 जण जखमी झाले. मृतांमध्ये 13 अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ 2 असे 3 आत्मघाती स्फोट झाले. दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतपाल्याचं पहायला मिळत असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिलाय.
तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर
अफगाणिस्तानातून पलायनासाठी विमानतळावर हजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे. काबूल विमानतळावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी आधीच व्यक्त केली होती. अमेरिकी दूतावासाने बुधवारी रात्री काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांजवळ न थांबण्याची सूचना आपल्या नागरिकांना केली होती. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्यूझीलंडनेही आपल्या नागरिकांना विमानतळावर न जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या देशांची भीती खरी ठरली.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिलाय. व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिला असून “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणालेत.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत 13 अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागात हा हल्ला झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला न करण्याची ग्वाही तालिबानने दिली होती. अमेरिकेने जाहीर केल्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत सर्व परदेशी सैन्य माघारी गेले पाहिजे, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.