अफगाणिस्तान चा राष्ट्रीय फुटबॉलपटू झाकी अनवारी याचा विमानातून पडून झाला मृत्यू
टीम : ईगल आय मीडिया
अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नांत अमेरिकी सैन्याच्या विमानाला लटकून प्रवास करताना पडलेल्या 3 जनांपैकी 1 युवक अफगाणिस्तान च्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू होता. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. क्रीडा विश्वातून अफगाणिस्तानचा युवा फुटबॉल पटू झाकी अनवारी याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त होत आहे.
15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबुल वर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी नागरिकांनी हरतर्हेने प्रयत्न केले. त्यातच अमेरिकेन लष्करी विमानास लटकलेल्या तिघांचा पडून मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, विमानातून पडून मृत्यू झालेल्या या तिघांविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. खाली पडलेल्या तिघांपैकी एकजण अफगाणिस्तानच्या नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू झाकी अनवारी हा आहे. अफगाणिस्तान फुटबॉल फेडरेशन ने फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. झाकी अन्वरी ( वय 19 वर्षे ) हा अफगाणिस्तानच्या फुटबॉल टीमचा खेळाडू होता. तो काबुल मध्येच राहत होता आणि इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेत होता.
झाकी अनवरी याचा जन्म अफगाणिस्तान मधील तालिबान राजवट संपल्यानंतर झाला होता. आणि आता तालिबान ची राजवट आल्याने आपले भवितव्य अंधारात असल्याचे त्याच्या लक्षात आले. उज्वल भविष्यासाठी अमेरिकेत जाण्याचा त्याचा प्रयत्न अशा प्रकारे अपयशी ठरल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत आहे.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. तालिबानी सत्तेत राहण्याची इच्छा नसणारे नागरिक जमेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याची तयारी करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी काबुल विमानतळावर अफगाणी नागरिक जमेल त्या विमानात बसून अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक तर विमानाला चक्क लटकले होते.
15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या सैनिकी विमानात क्षमतेपेक्षा जास्त अफगाणी नागरिक चढले. काही लोक तर विमानाला लटकले होते, त्याचे व्हीडिओ जगभरात व्हायरल झाले. हे विमान नंतर हवेत झेपावल्यानंतर चाकाच्या बाजूला लटकलेले तिघे विमातून खाली कोसळले. खाली पडून मृत्यू झालेल्या या तिघांपैकी एक जण अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अन्वरी हा आहे. जगभरातील सर्वच वृत्त वाहिन्या आणि न्यूज एजन्सीज नी या वृत्तास दुजोरा दिला आहे.