ईजिप्तमधील धक्कादायक घटना
टीम : ईगल आय न्यूज
ज्या शाळेत प्रेयसिने परीक्षा दिली, त्या परीक्षेत प्रेयसी नापास झाली म्हणून ती शाळाच पेटवून देण्याचा महापराक्रम एका प्रियकराने केला आहे. भावी पत्नीच्या प्रेमात वेडावलेल्या या प्रेमविराच्या हातात लग्नागोदर पोलिसांच्या बेड्या मात्र पडल्या आहेत. ईजिप्तमधील ही धक्कादायक घटना आहे.
इजिप्तच्या मेनोऊफिया प्रांतातील एक शाळा २१ वर्षांच्या तरुणानं पेटवून दिली. या शाळेत त्याची प्रेयसी शिकत होती. आणि शाळेतील परीक्षेत ती नापास झाली. त्यामुळे प्रियकर संतापला, त्यानं रागाच्या भरात तिची शाळाच पेटवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, की कोणीही जखमी झालं नाही.
दोघांचा साखरपुडा झाला होता. होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाली. प्रेयसी अनुत्तीर्ण झाल्यानं लग्न पुढे ढकललं जाईल. तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणानं प्रेयसीची शाळाच पेटवून दिली.आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली. शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली.
अग्निशमन दलानं काही वेळातच ही आग नियंत्रणात आली. शाळेला आग लावल्यानंतर आरोपी प्रेमवीर तरुण पळून गेला आणि स्वत:च्या गावात जाऊन लपला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस चौकशीत तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली. सध्या आरोपी तरुण पोलीस कोठडीत आहे.