बलात्कार प्रकरणात फरार स्वामी नित्यानंद चा अजब दावा
टीम : ईगल आय मीडिया
माझ्या शरिरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील करोना संपुष्टात येईल असा हास्यास्पद दावा बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या आणि अमेरिकेत जाऊन बेट खरेदी करून आपला स्वतंत्र कैलासा देश वसवणाऱ्या स्वामी नित्यानंद याने केला आहे.
बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी नित्यानंद स्वामीने अमेरिकेत एका बेटावर कैलासा नावाचा स्वतंत्र देश स्थापन केला असून त्याच्या या कथित देशात अजूनही त्याचे प्रवचन सुरू असते. नित्यानंदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतातून करोना महासाथीचा आजार कधी संपुष्टात येईल, असा प्रश्न प्रवचनादरम्यान नित्यानंदला त्याच्या शिष्याने विचारला. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने हास्यास्पद दावा केला. माझ्या शरिरात देवाच्या आत्म्याने प्रवेश केला आहे. भारतात माझे पाऊल पडताच भारतातील करोना संपुष्टात येईल, असे त्याने म्हटले.
स्वामी नित्यानंदविरोधात बलात्कार केल्याचा आरोप असून जवळपास दोन वर्षांपूर्वी भारतातून फरार झाला आहे. त्यानंतर स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील देश इक्वॅडोरमध्ये एक बेट विकत घेतलं असून या बेटाला स्वतःचा स्वतंत्र देश घोषित केले. नित्यानंदने या बेटाचे नाव कैलासा ठेवले आहे. कैलासाच्या वेबसाईटनुसार, हे बेट त्रिनिदाद आणि टोबॅगो देशांच्या जवळ आहे. यामध्ये एखाद्या देशातील व्यवस्थेप्रमाणे विविध सरकारी पदांवर लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लष्कर प्रमुख आणि इतर पदांचा यात समावेश आहे. नित्यानंदने माँ नावाच्या एका निकटवर्तीयाला पंतप्रधानही नियुक्त केलं आहे.
भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आणि करोनाचा संसर्ग कैलासा बेटावर फैलावू नये यासाठी नित्यानंद स्वामीने वसवलेल्या कैलासा देशात भारतीयांना प्रवेश बंदी केली आहे.