सौ.मंजुषा देशमुख आणि सौ सुजाता लोहोकरे यांना लायन्स, निमा वुमेन्स फोरम, यलमार समाज सखी मंचच्या वतीने पुरस्कार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
लायन्स व लायनेस क्लब पंढरपूर, निमा वूमेन्स फोरम पंढरपूर व सौदामिनी यलमार समाज सखी मंच पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कोविड योद्धा म्हणून डॉ.मंजुषा देशमुख तर आदर्श महिला उद्योजिका म्हणून सौ. सुजाता बाळासाहेब लोहोकरे यांचा सन्मान करण्यात आला. हे दोन्ही पुरस्कार सौ. विनयाताई परिचारक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विनया परिचारक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी व कोविड लाईफ लाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून जिवाची बाजी लावून हजारो रुग्ण व कोविडग्रस्त शेकडो गर्भवती मातांची सुलभ प्रसूती करून कोविडमुक्त केल्याबद्दल लाइफ लाईन हॉस्पिटलच्या सी. ई. ओ. डॉ.मंजुषा संजय देशमुख यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार देण्यात आला. तसेच ग्रामीण भागातून येऊन व्यवसाय तसेच शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना देखील अतिशय महत्वाच्या अशा इलेक्ट्रीसीटी विभागात ट्रानसफार्मर दुरुस्ती व नवनिर्मिती या क्षेत्रात काम करणाऱ्या व बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या सौ.सुजाता बाळासाहेब लोकरे यांना आदर्श महिला उद्योजिका हा पुरस्कार देण्यात आला.
याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.अर्चना कचरे यांनी आहार, योगा तज्ञ यांचे प्री मेनोपॉजल व पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासामधे घेण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. या दरम्यान मानसिक तसेच शारिरीक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडीटेशन व पूरक आहार याविषयी सविस्तर माहिती दिली.मेडीटेशन कसे घ्यावे याविषयी प्रात्यक्षिक घेतले. ही माहिती अतिशय उपयुक्त आहे तिचा आम्ही नक्की अवलंब करू असे महिलांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख लायन सेक्रेटरी ललिता कोळवले यांनी केले होते. कार्यक्रमासाठी लायन अध्यक्षा डॉ.सुजाता गुंडेवार, लायनेस व निमा वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.पल्लवी माने व सौदामिनी यलमार समाज सखी मंचच्या अध्यक्षा सौ.सारिका यलमार यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. तसेच चारीही संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाय.वर्षा कोळवले यांनी केले तर सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले-जाधव यांनी केले तर आभार लाय.प्रतिक्षा येलपले यांनी मानले.