पुणे : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रा आणि पालखी सोहळ्याचे प्रतीकात्मक पंढरीकडे प्रस्थान काही दिवसांवर आलेले असतानाच संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरात एका कोरोना ग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आळंदीमध्ये मंदिर परिसर प्रतिबंधात्मक विभाग म्हणून जाहीर करण्यात आला आहे. खेड आळंदीचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. त्याच बरोबर वारकर्यांनी पालखी च्या प्रस्थानासाठी आळंदीत येऊ नये असे आवाहन केले आहे .
यंदाची आषाढी यात्रा आणि संतांचे पालखी सोहळे स्थगित करण्यात आलेले आहेत. परंपरेनुसार १३ जून रोजी माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान अपेक्षित होते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा आषाढी पालखी सोहळा स्थगित करण्यात आलेला आहे . ३० जून रोजी प्रतीकात्मक पादुका प्रस्थान होणार असून १ जुलै रोजी विशेष वाहनातून या पादुका पंढरीत आषाढी एकादशीला आणल्या जाणार आहेत. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराजवळ कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यामुळे हा परिसर प्रतिबंधात्मक विभाग जाहीर केला आहे. त्यामुळे या भागात परवानगी शिवाय येणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही यावेळी तेली यांनी सांगितले.