पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल -रुक्मिणी मूर्तीची झीज होऊ नये म्हणून मूर्ती संवर्धनासाठी करण्यात येणारी वज्रलेप प्रक्रिया येत्या आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असून विधी व न्याय खात्याने यासाठीची आवश्यक ती परवानगी दिली आहे.
भाविकांना मिळणारे थेट पदस्पर्श दर्शन आणि प्रतिकूल वातावरण यामुळे श्री विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीची सातत्याने झीज होत असते. त्यामुळे औरंगाबाद येथील भारतीय पुरातन विभागाच्या शिफारशी नुसार मूर्तीच्या संरक्षणासाठी 1988 सालापासून वर्षांपासून 3 वेळा मूर्तीवर वज्रलेप करण्यात आलेला आहे. तसेच दर 5 वर्षानंतर हा लेप करण्याची गरज ही पुरातत्व विभागाने नोंदवली आहे.
त्यानुसार 2012 साली मूर्तीस वज्रलेप करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अनेकविध कारणामुळे वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन असून 17 मार्च पासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या बंदच्या काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील प्रलंबित अनेक महत्वाची कामे पूर्ण केली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस वज्रलेप करून घेण्यासाठी समितीने ऑक्टोबर 2019 पासून शासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. भारतीय पुरातत्व विभागानेही वज्रलेप करण्यासाठी कधीही तयार असल्याचे कळवले आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर मंदिर समितीने 16 मार्च रोजी विधी व न्याय खात्याकडे वज्रलेप करण्यासाठी परवानगी मागितली होती.
त्याचबरोबर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज, कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शासनाने विठ्ठल ,रुक्मिणी मूर्तीस वज्रलेप करणयाची परवानगी दिलेली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर समितीने 30 जून अखेर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून याच दरम्यान आता मूर्तीवर वज्रलेप करण्यात येणार आहे. मागील 8 वर्षांपासून रखडलेले मूर्ती संवर्धनाचे कामही लॉक डाऊन च्या काळात पूर्ण होत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनासाठी आवश्यक असलेली वज्रलेप प्रक्रिया करण्यासाठी शासनाची परवानगी मिळालेली आहे. लवकरच मंदिर समिती सदस्यांसोबत चर्चा करून भारतीय पुरातत्व विभागास कळवण्यात येईल आणि आषाढी यात्रेपूर्वी मूर्तीस वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
श्री सुनील जोशी,
कार्यकारी अधिकारी,
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपुर