टीम : ईगल आय मीडिया
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह 5 जणांना हाथरस येथील पीडित मुलीच्या नातेवाईकांना। भेटण्याची परवानगी आज उत्तर प्रदेश प्रशासनाने दिली आहे. आज राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 35 खासदार शेकडो कार्यकर्ते हाथरास कडे निघाले होते. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने परवानगी देऊन तणाव टाळला आहे.
हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वतः कार चालवत होत्या. तसंच त्यांच्या सोबत राहुल गांधीही आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा वाढवला होता. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. यमूना एक्स्प्रेस वे वर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही केला होता.
या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हाथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली होती. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते.