पंढरपूर : ईगल आय मीडिया
एक जुलै पासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी निर्जंतुक करून घ्यावी तसेच मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची व शिक्षकांची शाळा सुरू करताना काळजी घ्यावी, अशी सूचना आ प्रशांत परिचारक यांनी मुख्याध्यापकांना केली.
पंढरपूर येथे पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील माध्यमिक शाळा सुरू करताना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी आ प्रशांत परिचारक बोलत होते. यावेळी जि प सदस्य वसंतनाना देशमुख, मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, पंचायत समितीच्या सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती प्रशांत देशमुख, नाना गोसावी, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे सह मुख्याध्यापक उपस्थित होते.
ऑनलाइन शिक्षण देणे खर्चिक आहे, ग्रामीण भागात मोबाईलसह नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यामुळे शाळेचा प्रमुख घटक म्हणून मुख्याध्यापकांनी रोडम्याप तयार केला पाहिजे – आ प्रशांत परिचारक
यावेळी मुख्याध्यापकांनी ऑनलाइन अध्यापनातील अडचणी सांगितल्या, प्राचार्य प्रशांत पाटील, उत्तम लवटे, अशोक यलमार, कालिदास कवडे, गायकवाड, अनिल भिंगारे, भुताडे आदींनी विविध विषयांवर विचार व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी नाळे यांनी शासन आदेशानुसार शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून नियोजन करावे, शिक्षकांनी शाळेच्या गावात राहावे असे सांगितले.