मी जे बोलतो ते पूर्णच करतो ; माढ्याच्या विकासाचा शब्दही पूर्ण करणार

दारफळ येथील प्रचारसभेत अभिजीत पाटील यांची ग्वाही

पंढरपूर : प्रतिनिधी

आजवर मी जे शब्द दिले ते पूर्ण केले आहेत आणि याची पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना, सभासदांना अनुभूती आलेली आहे, माढा विधानसभेच्या विकासाचा हि मी शब्द देतो आणि तो पूर्णच करणार अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दारफळ येथील प्रचार सभेत बोलताना दिली.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील पुढे म्हणाले की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरताना सभासदांना शब्द दिला होता कि, मागील थकीत ऊस बिले देऊनच नव्या हंगामाची मोळी टाकणार, सभासदांनी माझ्या शब्दावर विश्वास टाकून मला चेअरमन केले.

पूर्वीच्या संचालकांनी थकवलेले 40 कोटी रुपये मी बॉयलर पेटवण्यापूर्वी देऊन टाकले, पहिल्या हंगामात २ हजार ५०० रुपये दर देण्याची ग्वाही मी दिली होती, ७ लाख २६ हजार गाळप केले. इतर साखर कारखाने २ हजार ते २२०० रुपये देत असताना मी शब्द दिल्या प्रमाणे २ हजार ५०० रुपये दर दिला. मागील हंगामाच्या सुरुवातीला मी ऊस दराची कोंडी फोडत ऊस पहिली उचल 2550 रुपये जाहीर केली. आणि अंतिम दर ३ हजार रुपये दिला. यावर्षीच्या हंगामात हि ३ हजार ५०० रुपयांचा दर जाहीर केला असून तो देण्याचे नियोजन झालेले आहे.

दारफळ मधून मागील हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऊस नेला, त्यावेळी मी उभा राहण्याचे नियोजन नव्हते. तरीपण ऊस नेला आणि विठ्ठलच्या सभासदाच्या बरोबर दर दिला. जे करू शकतो तोच शब्द द्यायचा हे माझे धोरण आहे, वचनपूर्तीचा माझा इतिहास असून माढ्याच्या विकासाचा शब्द मी देतो आणि तो पूर्ण करून दाखवेन याची ग्वाही पण देतो, असेही पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी रामकाका मस्के, विजय भगत, परमेश्वर अतकरे, पांडुरंग बारबोले, मोहन बारबोलेल, अभय साठे, संजय काळे, रुपेश झाडकर, नाना साळुंखॆ, तुषार बारबोले, अजय मुकने आदी उपस्थित होते. यावेळी रामकाका मस्के, विजय भगत यांनीहि मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

error: Content is protected !!