आज अभिजीत पाटील गटाचे शक्ती प्रदर्श
पंढरपूर : ईगल आय न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ६ व्या दिवशी ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज ( गुरुवारी ) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणारे दाखले अडवल्याच्या कारणावरून श्री विठ्ठल सहकारी आणि सहकार शिरोमणी या दोन्ही साखर कारखान्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बुधवारी दोन्ही कारखान्यावर काळे आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्याची प्रशासनाशी वादावादी झाली.
दोन्ही बाजूनी दाखल्यांची आडवा- आडवी
उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असलेले दाखले देताना सहकार शिरोमणी आणि श्री विठ्ठल सहकारी या दोन्ही कारखान्याच्या प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे आरोप उमेदवारांकडून होऊ लागले आहेत. सहकार शिरोमणी साखर कारखान्याकडून ऊस गाळपास आलेले दाखले दिले जात नसल्याचा आरोप होत आहे तर श्री विठ्ठल सर्व सेवा संघ आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून कल्याणराव काळे यांची कसलीही येणे बाकी नसल्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काळे समर्थकांनी केला आहे. दोन्ही कारखान्यावर समर्थकांनी गोंधळ घातल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी सहाव्या दिवशी एकूण ६० अर्ज दाखल झाले आहेत. २१ जागांसाठी १३६ उमेदवारांचे एकूण १४१ अर्ज दाखल झालेले आहेत. बुधवारी सहकार शिरोमणीचे माजी संचालक आणि परिवर्तन पॅनेलच्या वतीने ऍड. दीपक पवार आणि त्यांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांनीही बुधवारी आपला अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ( गुरुवारी ) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे आपल्या पॅनेलचे अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील असे दिसून येते.
गट निहाय दाखल उमेदवारी अर्ज
भाळवणी ३७ , भंडीशेगाव ३१, गादेगाव १६, कासेगाव १०, सरकोली १५, महिला प्रतिनिधी राखीव १८, सहकारी संस्था प्रतिनिधी २, अनु. जाती जमाती ३, भ. जा. वि. जमाती १२ असे एकूण १४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.