अभिजित पाटील यांची पालकमंत्र्याकडे मागणी
पंढरपूर : eagle eye news
दुष्काळी परिस्थितीमुळे पंढरपूर -मंगळवेढा तालुक्यात पाणी, चारा टंचाई असून दोन्ही तालुक्यात चारा डेपो सुरु करा, नीरा उजवा कालव्याचे पाणी रांझणी पर्यंत सोडा, उजनी धरणातून नदी आणि कालव्यास पाणी सोडा अशी मागणी करणारे निवेदन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र बिकट अवस्था झाल्याने जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पंढरपूर शहरावरही जलसंकट कोसळले असून सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. तर चार दिवस पुरेल एवढेच पाणी भीमा नदीत शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर दि.३०ऑगस्ट रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले.
यंदा पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यात कसलाही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. पाण्यामुळे पिके करपू लागली आहेत. भिमा नदी पात्र कोरडे असुन नदी व उजनीच्या दोन्ही कालव्यास पाणी सोडावे याबाबत ही चेअरमन अभिजीत पाटील यांनी पलकमंत्र्यांशी चर्चा केली. या संदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले असून सकारात्मक विचार होईल असा विश्वास व्यक्त केला.
सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी आहोत, चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी प्रयत्न करीन आहोत, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.