अभिजित पाटील गटाचे शक्ती प्रदर्शन : भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल
फोटो
श्री सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाटील गटाची निघालेली रॅली
पंढरपूर : eagle eye news
ज्या प्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखाना गत वैभव प्राप्त करतोय तसेच सहकार शिरोमणी सुद्धा गतवैभव प्राप्त करेल. सभासद परिवर्तन करण्यासाठी उत्सुक असून विठ्ठलचे देणे आम्हाला द्यावे लागले तसेच सहकार शिरोमणीचेहि थकीत देणे द्यावे लागेल. आम्हाला निवडून दिल्यानंतर ७० दिवसात मागील थकीत बिले आम्ही देऊ आणि त्यानंतरच कारखाना सुरु करू, विद्यमान संचालक मंडळाने शेतकऱ्यांना ऊस बिल देताना हजार आणि पाचशे रुपयाने देऊन थट्टा केली. त्यामुळे शेतकरी परिवर्तनाची वाट पाहत आहे, असा दावा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अभिजित पाटील गटाच्या उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते डॉ. प्रा. बी. पी. रोंगे यांच्यासह सर्व उमेदवार आणि हजारो शेतकरी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले कि, या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी जे योग्य पद्धतीने बोलणी झाली तर ऍड. दीपक पवार यांच्या गटाला हि सोबत घेण्याचा विचार करू, पवार कुटूंबाने हि मागच्या १० ते १२ वर्षात शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे सन्मानाने बोलणी झाली तर त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल,उसाला जेवढा दर विठ्ठल सहकारी देईल, तेवढाच सहकार शिरोमणी च्या सभासदांना हि दर दिला जाईल, असेही पाटील म्हणाले.
गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पाटील गटाच्या रॅलीस सुरुवात झाली. रॅलीत अभिजित पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत सह्भागी झाले होते. रॅलीत मोठ्या संख्येने युवक, शेतकरी, सभासद आणि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.