आयकर विभागाकडून तपासणी पूर्ण : अभिजित पाटील यांची माहिती
टीम : ईगल आय न्यूज
बहुजन समाजातील नेतृत्व पुढे येऊ द्यायचे नाही, मी विठ्ठल सहकारी जिंकल्याने अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी मला रोखण्यासाठी चुकीची माहिती देऊन हे षडयंत्र रचले आहे. आय टी च्या तपासात ना रक्कम सापडली,ना सोने सापडले ना इतर बेहिशेबी मालमत्ता सापडली. त्यांनी मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली, त्यामुळे आयटीच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे, त्यामुळे तालुक्यात मी उजळ माथ्याने फिरू शकतो, विरोधकांना यापुढे जशास तसे उत्तर देऊ असा ईशारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला आहे.
मागील 4 दिवस dvp उद्योग समूहाच्या साखर कारखाने आणि कार्यालयात येऊन आयकर विभागाच्या पथकांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात याची मोठी चर्चा रंगली होती. रविवारी आय टी च्या पथकांची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर उस्मानाबाद येथे अभिजित पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, मी विठ्ठल सहकारी जिंकला, त्यानंतर माझी विजयी घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी हे षडयंत्र रचले आहे. आयकर विभागाने केलेल्या तपासणीत काहीही आढळले नाही. त्यांना हवी ती कागदपत्रे दिली आहेत. काही कागदपत्रे देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असून त्यावेळेत तीसुद्धा दिली जाईल.
राजकीय विरोधातून ये सर्व केले गेले आहे. विरोधकांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, विरोधकांचे नाव योग्य वेळी जाहीर केले जाईल, येणाऱ्या काळात मी आणखी चौपट ताकदीने काम करेन आणि या भागातील शेतकरी, युवक यांचे प्रश्न मार्गी लावेन. या घटनेतून मला बदनाम आणि राजकिय दृष्टीने क्षीण करण्याचा प्रयत्न होता मात्र यामुळे मला आणखी मानसिक बळ मिळाले आहे. माझे सहकारी, मित्र, कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागतील आणि विरोधकांना कामातून उत्तर देतील, असाही ईशारा पाटील यांनी दिला.