भीषण अपघात 15 मजूर ठार

टीम : ईगल आय मीडिया

जळगावच्या यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील किनगाव नजीक हा अपघात घडला.

साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांच्या वरती मजूर बसले होते. या रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक उलटा झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातग्रस्त ट्रक धुळे जिल्ह्यातील नेर येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या किनगाव येथे अचानक ट्रक उलटला. त्यात १५ जण जागीच ठार झाले तर काही जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून हे सगळे रावेर, आभोडा, केऱ्हाळा, विवरा येथील आहेत.

शेख हुसेन शेख (वय ३० रा. फकीरवाडा, रावेर), सरफराज कासम तडवी (वय ३२, केऱ्हाळा), नरेंद्र वामन वाघ (२५, रा. आभोडा), दिगंबर माधव सपकाळे (५५, रा. रावेर), दिलदार हुसेन तडवी (२०, आभोडा), संदीप युवराज भालेराव (२५, रा. विवरा), अशोक जगन वाघ (४०, रा. आभोडा), दुर्गाबाई संदीप भालेराव (२०, रा. आभोडा), गणेश रमेश मोरे (५, रा. आभोडा), शारदा रमेश मोरे (१५, रा. आभोडा), सागर अशोक वाघ (०३, रा. आभोडा), संगीता अशोक वाघ (३५, रा. आभोडा), सुमनबाई शालीक इंगळे (४५, रा. आभोडा), कमलाबाई रमेश मोरे (४५, रा. आभोडा), सबनुर हुसेन तडवी (५३, रा. आभोडा) अशी मयतांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!