दोघांमध्ये बंद द्वार झाली चर्चा : उत्सुकता शिगेला
टीम : ईगल आय न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी या दोघांची मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरी भेट झाली आहे. आज ( गुरुवार ) सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले आणि या दोघांमध्ये बंदद्वार दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे.
गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर देशभर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. गौतम अदाणी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करावी अशी मागणी होत होती. मात्र त्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असंहि त्यांनी म्हटलं होतं. जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणात योग्य असेल असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी हे भेटले तेव्हा त्या ठिकाणी इतर कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीही तपशील समोर आलेला नाही.