वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपूरच्या चंद्रभागेतून पुढे
पंढरपूर : eagle eye news
वीर धरणातून गुरुवारी सायंकाळी नीरा नदीला सोडलेले ६१ हजार क्युसेक्स पाणी सुमारे ३० तासानंतर पंढरपूर येथे दाखल झाले. त्यामुळे दोन वर्षानंतर चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहिली आणि वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचे वेढा दिला. जुना दगडी पूल पाण्याखाली गेला. मात्र सायंकाळनंतर हे पाणी ओसरू लागले आहे.
नीरा नदीच्या खोऱ्यात २४ आणि २५ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे वीर धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अचानक वाढले, वीर धरणाची पाणी पातळी ८५ टक्केहून अधिक झाल्याने नीरा उजवा कालवा विभागाने वीर मधून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता वीर धरणातून ६१ हजार ४ ८८ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीला सोडला होता. हे पाणी नीरा नदीतून सुमारे ३० तासांचा प्रवास करून शुक्रवारी रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल झाले. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी दोन वर्षानंतर पुन्हा एकदा दुथडी भरून वाहिली.
यापूर्वी २०२२ साली भीमेला पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र २०२३ साली अत्यल्प पाऊस झाल्याने संपूर्ण पावसाळ्यात वीर आणि उजनी धरणातूनही पाणी सोडले गेले नाही. तसेच भीम काठच्या माळशिरस, माढा, पंढरपूर तालुक्यातही अत्यल्प पाऊस पडल्याने ओढे नाले, कोरडे ठाक होते. परिणामी गेल्या वर्षी भीमा नदी कोरडीच राहिली, उजनी धरणातून पाणी सोडून बंधारे भरून घेतले गेले. शनिवारी मध्यरात्री चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. सकाळीच येथील बंधारा, जुना दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याने वेढा घातलेला होता. प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दोन वर्षानंतर चंद्रभागा दुथडी वाहू लागल्याने पाणी बघण्यासाठी नागरिकांनी घाटावर गर्दी केली होती.