सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पंढरपूरकरांना आवाहन !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुकारण्यात आलेल्या भारत बंद मध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भात आज येथील शासकीय विश्रमगृहात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला पाठिंबा व्यक्त करण्यात आला तसेच या संदर्भात पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला उद्या बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन करणारे लेखी पत्र दिले.
दरम्यान, पंढरपूर तालुका काँग्रेसच्यावतीने आज तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या कायद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मोदींचे हे तीन कायदे शेतकरी विरोधी आहेत, त्यामुळे त्यांचे प्रतिकात्मक दहन करण्यात येत असल्याचे तसेच 8 रोजीच्या भारत बंदमध्ये तालुका काँग्रेस सहभागी असल्याचे सांगितले.
शासकीय विश्रमगृहात झालेल्या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी मुळे, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, मनसेचे तालुका प्रमुख शशिकांत पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रदेश प्रवक्ते रणजित बागल, श्रीकांत शिंदे, धनंजय पाटील, सागर कदम, कांतीलाल बागल,महेश पवार, राष्ट्रवादी युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रिया भोसले, कीर्ती मोरे, साधना राऊत, विश्रांती भुसनर, राष्ट्रवादी किसान सभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी जाधव, कांचन खंडागळे, आदींसह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व पंढरपूर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून निदर्शने करण्याचे ही ठरवण्यात आले.