दूध दर वाढीच्या मागणीसाठी अनवली येथे रास्ता रोको
फोटो ; दूध दर वाढीच्या मागणीसाठी पंढरपूर – मंगळवेढा मार्गावर अनवली येथे रास्ता रोको प्रसंगी रस्त्यावर बसलेले आंदोलक छायाचित्रात दिसत आहेत.
पंढरपूर : eagle eye news
दूध उत्पादन हा शेतकर्त्यांचा जोड व्यवसाय असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्या ऐवजी ठराविक मुजोर खाजगी दूध संघांच्या पाठीशी उभा राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते आहे. भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल. दुधाचे दर कमी करीत असताना पशु खाद्यांचे दर वाढवले जात आहेत. लंम्पि आजाराने जनावरे मयत झाली आहेत. त्यांना शासनाने जाहीर केलेलं अनुदान दिलेले नाही. तेही दिले जावे अशी मागणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुधाचे दर कमी झालेले आहेत. याच्या निषेधार्थ भालके यांच्या नेतृत्वाखाली अनवली ( ता. पंढरपूर ) येथील चौकात भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी भालके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि युवक उपस्थित होते. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलींद पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
पंढरपूर — मंगळवेढा मार्गावर गतिरोधक करण्याची मागणी
यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी दूध दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवलाच शिवाय पंढरपूर – मंगळवेढा मार्गावर अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी, मल्लेवाडी, शरद नगर अशा ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणी केली. या मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने आजवर अनेक अपघात होऊन नागरिकांचे बळी गेले आहे. त्यामुळे या मार्गावर गतिरोधक करावेत अशीही मागणी भालके यांनी यावेळी केली.