कोरोनाच्या भीतीने अंगणवाड्या उघडण्यास नकार
सोलापूर : ईगल आय मीडिया
एका बाजूला कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेली असताना दुसऱ्या बाजूला अंगणवाड्या मात्र सुरू करण्याचा फतवा शासनाने काढला आहे. त्यामुळे चिमुकल्यांसह आपलाही जीव धोक्यात घालण्यास विरोध करून अंगणवाडी सेविकांनी शाळा उघडण्यास विरोध दर्शविला आहे.
तूर्तास तरी अंगणवाडी केंद्रे नियमित स्वरुपात उघडायला लावू नका, अशी मागणी करीत सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी उद्या (शुक्रवारी) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली. या संपात कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी 3 जुलैपासून अंगणवाडी केंद्रे नियमित स्वरुपात उघडून दररोज पाच मुलांची वजने घेण्याचे आदेश काढले आहेत. सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा कहर सुरूच असून अजुनही तो थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेशसुध्दा 31 जुलैपर्यंत मागे घेण्यात आले आहेत. असे असताना अंगणवाडी केंद्रे सुरू करणे कितपत व्यवहार्य ठरणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी नव्याने लॉकडाउन सुरू झाले आहे. अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाच व्यक्ती एकत्र आल्या तर गुन्हा नोंदविला जाणार आहे. अशा परिस्थितीत पालक तरी आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवितील का हा प्रश्नच आहे. आले तरी त्यांच्यासाठी सॅनिटायझरसाठी दररोज शंभर ते दोनशे रुपयाचा खर्च कोण करणार असे अनेक प्रश्न यानिमित्तने उपस्थित होत आहेत, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
वास्तविक अंगणवाड्या बंद असल्या तरी सेविका व मदतनीस या नियमितपणे गृहभेटी देत आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोनाबाधित भागामध्ये त्या सर्व्हे करीत आहेत. मुलांची वजने, उंची घेणे व ती कॅशमध्ये भरणे चालू आहे. सॅम मॅमच्या मुलांना व पालकांना मार्गदर्शन करण्याचे काम व गरोदर आणि स्तनदा मातांचा आहार वाटप सुरूच आहे. आहार वाटपाचा अपवाद वगळता अंगणवाडी केंद्रे न उघडता सर्व कामे कर्मचारी करीतच आहेत. असे असताना नियमित स्वरुपात अंगणवाडी सुरू करून कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. याचा फेरविचार व्हावा व अंगणवाडी केंद्रे सध्या तरी सुरू करू नयेत. तसेच त्यांना कोरोनाच्या सर्व्हेचे कामही देऊ नये या मागणीसाठी सर्व अंगणवाडी कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करीत आहेत. शासनाने याची दखल घेतली नाही तर अंगणवाडी कर्मचार्यांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावे लागेल, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.