५५ हजारांची लाच : पंढरपूर प्रांत कार्यालयातील दोघांना पकडले

शेत जमिनीचा वाद : शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : प्रतिनिधी


प्रलंबित शेत जमिनीच्या खटल्यात मूळ जमीन मालकाचा अर्ज स्वीकारू नये यासाठी पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपाई यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणातील तक्रारदार हा खर्डी ( ता.पंढरपूर ) येथील शेतजमीन वाटेकरी म्हणून पहात होता. दरम्यान, मूळ जमीन मालकाने खर्डी मंडलाधिकारी यांचेकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खर्डी मंडलाधिकारी यांनी फेटाळला असता त्या निकालाविरोधात मूळ जमीन मालकाने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता.

या अर्जाचा निकाल तक्रारदार याच्या बाजूने लावण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते ( रा. वाखरी, तालुका पंढरपूर) आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी ( रा. गणपती नगर,पंढरपूर ) यांनी संगनमत करून ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती ५५ हजार रुपये निश्चित केले. सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता ५६ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!