API सचिन वाझे NIA च्या अटकेत

टीम : ईगल आय मीडिया

मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे  यांना रात्री उशिरा NIA कडून अटक करण्यात आलीय. शनिवार (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर 13 तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आलीय. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने अखेर NIA च्या प्रदीर्घ चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात.  त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे एपीआय सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर एनआयएनं त्यांना अटक केलीय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 19 तारखेला ठेवण्यात आलेली आहे.

सचिन वाझे यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!