अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांची माहिती
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शासनाच्या निर्देशानुसार आषाढी यात्रा सोहळा होणार आहे. पंढरपुरात आषाढी वारीसाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरा लगतच्या परिसरासाठी 29 जून ते 02 जुलैपर्यंत संचार बंदी लागू करण्याचा विचार असून, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे दाखल केला असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी भरणार नाही. त्यामुळे पंढरपूर शहरात कोणीही येऊ नये असे ,आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. तरीही वारकरी, भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता लक्षात घेता. जिल्ह्यामध्ये त्रिस्तरीय पोलीस नाकाबंदी करण्यात आली आहे. भाविकांना पंढरपुरात येऊ न देण्यासाठी 1500 पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व तालुका व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या अधिकृत पास व्यतिरिक्त कोणालाही पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही असेही श्री.झेंडे यांनी सांगितले.
संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहर तसेच शहरालगत तालुक्यातील भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगांव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगांव, शिरढोण, कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत व परिसरामध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. संचार बंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.
1500 पोलिसांना सुरक्षा किट वितरण
आषाढी वारीच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने बंदोबस्तावरील 1500 पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये 10 मास्क, 01 सॅनिटायझर बॉटल, 04 ओआरएस पावडर, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या, एक फेस शिल्ड व पावसापासून संररक्षणासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले.