मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपंन

नाशिकचे अहिरे कुटुंब ठरले मानाचे वारकरी दाम्पत्य

पंढरपूर : ईगल आय न्यूज

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

बुधवारी पहाटे २ वाजून १६ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय महापूजा विठ्ठल मंदिरात आगमन झाले. त्यानंतर मानाचे वारकरी अहिरे पतिपत्नी आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवाला वस्त्र अर्पण करण्यात आले. पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी विठ्ठलाची आरती गाऊन महापूजा संपन्न झाली. त्यानंतर तीन वाजून ३० मिनिटांनी रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. महापूजा नंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी दांपत्य तसेच अन्य उपस्थित मान्यवर यांचा विठ्ठल सभा मंडपात सत्कार करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्य महापूजेचे मानकरी

अंबासन ( ता. सटाणा, जिल्हा नाशिक ) येथील अहिरे दाम्पत्य यंदा शासकीय महा पुजेचे मानकरी ठरले आहेत. बाळू शंकर अहिरे ( वय ५६ वर्षे, आशाबाई शंकर अहिरे ( वय , ५० वर्षे ) अशी त्या दांपत्यास आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेचस उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. शेतकरी कुटुंब अहिरे दाम्पत्य गेली १६ वर्षापासून पंढरीची वारी करीत आहेत, यंदा मात्र त्यांना आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. या दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार खालील प्रमाणे देण्यात आले.
संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना 75 हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना 50 हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


आरोग्यदूतचे प्रकाशन
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदुत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मेगडंबरीसाठी दोन कोटी 45 लाख रुपयाचे चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांच्याही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.


Leave a Reply

error: Content is protected !!