वारी स्थगित झाल्याने पंढरपूरच्या अर्थकारणास बसणार फटका !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दरवर्षी येणारी आषाढी वारी ही एक पंढरपुरातील व्यापारी, नागरिकांसाठी पर्वणी ठरायची. यंदा मात्र कोरोनामुळे आषाढी वारी ही स्थगित केल्याने पंढरपूर च्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे.

आषाढी यात्रा ही वर्षातील सर्वात मोठी असते. त्यामुळे दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र यंदा कोरोना मुळे यात्रा स्थगित केल्याने व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानामध्ये माल भरलेला नाही. हॉटेल व्यावसायिकांची अवस्थाही नाजूक आहे. बाहेरील ग्राहक पंढरपुरात येत नसल्याने व्‍यवसाय जवळजवळ ठप्प आहेत. काही हॉटेल व्यवसायिकांनी पार्सल सेवा सुरू केली आहे. मात्र, त्यालाही मर्यादा आहे. रोजचे भाडे, कामगारांचा पगार कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. एकूनच कोरोनामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूर च्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे.
वारी काळात हॉटेल व्यावसायिकांची चांदी असते. यंदा मात्र कोरोनामुळे सारे नियोजन कोलमडले आहे. हजारो रूपयांचा तोटा हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
दर वर्षाची वारीची परंपरा यंदा खंडीत होणार आहे. पंढरपूरच्या अर्थकारणावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. दरवर्षी येणारी मंडळी फोन करून मित्रमंडळींना काय परिस्थिती आहे, याबाबत माहिती घेत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, यंदा घरूनच वारी करण्याची मानसिक तयारी वारकरी, भाविक भक्तांनी केल्याचे दिसून येत आहे.
एका बाजूला कोरोना अन् दुसर्‍या बाजूला निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी या दुहेरी संकटात पंढरपुरातील नागरिक, व्यापारी सापडले आहेत. वारी वरच पंढरपूरच्या अर्थकारण हे अवलंबून असते. बाहेरून येणारा भाविक प्रसादिक साहित्य, विविध प्रकारच्या मुर्त्या, खेळणी खरेदी करत असतो. शिवाय तो पंढरीत मुक्काम करून आपली पुढची वाटचाल करत असतो. यंदा वारी होणार नसल्याने स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

प्रशासन बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पंढरपुरात प्रवेश देत नाही. २५ जून पासून जनता कार्फ्य सुरू होणार असल्याच्या चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर यंदा पंढरीच्या अर्थकारणास मोठा फटका बसणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!