गतवर्षीपेक्षा 2 कोटीची वाढ : प्राक्षाल पूजेने आषाढीची सांगता
पंढरपूर : eagle eye news
नुकतीच संपन्न झालेली आषाढी यात्रा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसाठी फायद्याची ठरलेली आहे. यंदा मंदिर समितीला यात्रा काळात ८ कोटी ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात २ कोटी रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. याबरोबरच देवाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु झाले असून आजपासून देवाचे दर्शन रात्री ११ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे.
यंदाची आषाढी यात्रा भाविकांच्या विक्रमी गर्दीमुळे संस्मरणीय झाली आहे, दिनांक १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. ६ जुलै पासून मंदिर समितीने श्री विठ्ठल दर्शन २४ तास सुरु केले होते. शुक्रवारी २६ जुलै रोजी प्रक्षाळ पूजेसोबतच आषाढी यात्रेची सांगता झाली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठलास जलाभिषेक करण्यात आला.
यंदाच्या आषाढी यात्रेच्या दरम्यान १० लाख ८८ हजार ५२७ विठ्ठल भक्तांनी दर्शन घेतले. यामध्ये ४ लाख ८३ हजार ५२३ भाविकांनी पदस्पर्शदर्शन व ६ लाख ५ हजार ४ भाविकांनी मुखदर्शन घेतले. यंदाच्या यात्रेचा कालावधी दिनांक ६ ते २१ जुलै असा होता. यामध्ये मंदिर समितीला ८ कोटी ३४ लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
देवाच्या चरणाजवळ ७७ लाख ६ हजार ६९४ रुपये, भक्तनिवास ५० लाख ६० ४३७ रुपये, देणगी ३ कोटी ८२ लाख २६ हजार ८२८ रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे यंदा गतवर्षीच्या तुलनेत देणगी कमी झाली आहे. गेल्यावर्षी ४ कोटी ११ लाख ६१ हजार ५१२ रुपये एवढी देणगी रक्कम जमा झाली होती. यंदा लाडूप्रसाद विक्रीतून ९८ लाख ५३ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदा यात्रेच्या काळात १७ लाख ८८ हजार ३७३ रुपयेचे सोने दान मिळाले आहे. इतर सर्व माध्यमातून मिळालेले एकूण ८ कोटी ३४ लाख ८४ हजार १७४ रुपये मिळाले आहे. मागीलवर्षी हेच उत्पन्न ६ कोटी २७ लाख ५४ हजार २२७ रुपये इतके होते असेही मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.