आषाढी वारी च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आगामी आषाढी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांना 40 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे एसटी बसने प्रस्थान करता येणार आहे. तसेच वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पायी चालण्याची परवानगी शासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे. यात्रे संदर्भातील आज शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे.
यंदा राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी असून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. या अनुषंगाने आषाढी यात्रा साजरी करण्यासाठी आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा एक आदेश निघालेला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा ही गतवर्षीप्रमाणे नियम पाळून होणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी शासनाने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशीचा काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर या सर्व पालख्या आपापल्या ठिकाणी परत फिरतील.