उपमुख्यमंत्री अजित पवार : पालखी सोहळ्याबाबत नियम शिथिल केल्याचा दावा
टीम : ईगल आय मीडिया
‘आम्ही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करतो. राज्याच्या आरोग्याच्या हिताकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. कुंभमेळ्यात जे घडलं तसं इथं घडू नये याची दक्षता घेणं आवश्यक आहे. वारीची परंपरा टिकली पाहिजे. त्यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
करोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पायी वारीला परवानगी देण्याऐवजी दहा मानाच्या पालख्या या वेगवेगळ्या ठिकाणांहून बसमधून पंढरपूरला नेण्याचे ठरविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर अध्यात्मिक आघाडीनं आक्षेप घेतला असताना अजित पवार यांनी आज पुन्हा वारीबाबत सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे.
वारीची परंपरा टिकली पाहिजे. पण, कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, वारकरी पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करुनच राज्य सरकारने वारीचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा टिकली पाहिजे, पण सध्या करोनाची सावटही आहे. त्यामुळं वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीला शिथिलता देण्यात आली आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर ही परंपरेप्रमाणे आषाढीची पायी वारी करण्याऐवजी मानाच्या दहा पालख्या या बसमधून पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाखरी येथून दीड किलोमीटरपर्यंत पोलिस बंदोबस्तात पायी वारी जाणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला मात्र आळंदी आणि देहू या ठिकाणी प्रत्येकी १०० जणांना, तर अन्य आठ ठिकाणी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे.