शासनाच्या धोरणामुळे कोरोनास अटकाव
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना साथीमुळे यंदाची आषाढी यात्रा स्थगित झाली,त्या ऐवजी यंदा प्रतिकात्मक यात्रा साजरी करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील वारकरी सांंप्रदायाच्या भावना दुखावल्या, अनेकांना दुःख अनावर झाले, अनेकांनी यात्रा रद्द होण्यासाठी राज्य शासनाला जबाबदार धरले. पंढरपूर शहरात संचारबंदी करून बाहेरच्या नागरिकांना येण्यासाठी मनाई करण्यात आल्यामुळे या प्रशासकीय धोरणावर टीकाही झाली. परंतु यात्रा स्थगित करूनही पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे, तर आणखी काही नागरिक आणि प्रशासनातील लोकांना कोरोना पॉझिटिव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने आषाढी यात्रा झाली असती तर काय झालं असतं सवाल उपस्थित होत आहे.
आषाढी यात्रा ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक, धार्मिक उत्सव मानला जातो, आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राशेजारील राज्यातूनही लाखो भाविक पंढरीला येत असतात. शेकडो वर्षाची परंपरा आजवर कोणत्याही संकटात, कसल्याही आपत्तिजनक परिस्थितीत अखंडित राहिली आहे. परंतु यावर्षी प्रथमच पंढरीची वारी चुकली आहे, एवढेच नाही तर अनेक दशकांची वारीची परंपरा असणारे लाखो वारकरी घरीच बसून राहिले. काहीनी वारी पोहोचवण्याचा निर्धार करून पंढरीची वाट धरली होती, तरीही त्यांना कधी हात जोडून तर कधी सक्तीने उचलून एसटी बस मध्ये परत पाठवून दिले.
ज्या प्रदक्षिणा मार्गावर लाखो वैष्णवांची दाटी होते त्या मार्गावर लाकडी ब्यारेकेटिंग केले होते. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात शेकडो वर्षांपासून भेदाभेद हा भ्रम अमंगळ ठरवून वैष्णवांनी सामाजिक एकतेचा खेळ मांडला, त्या वाळवंटात घेऊन जाणारे सर्व घाट बंद करून टाकण्यात आले होते. सश्रद्ध असलेल्या शासन आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या निर्दयतेने पंढरीचे रस्ते बंद केले.
शेकडो पालखी सोहळे, हजारो दिंड्या यांना वारीला येण्यास मज्जाव करण्यात आला. आणि केवळ मनाच्या 9 पालख्यांना लाखोंचा लवाजमा नाकारून केवळ 20 वारकऱ्यांसह एका दिवसात एस टी बसने पंढरीत येण्याची परवानगी दिली.
एव्हढे सगळेे नियम कदाचित इंग्रज काळातही लागू केले गेले नसतील, त्यामुळे वारीची परंपरा कठोरपणे खंडित करण्यात आली.
हे करीत असताना राज्य शासनाला आनंद नक्कीच वाटला नसेल. राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण स्वरूप धारण करीत आहे, स्वतः मुख्यमंत्री यांची प्रकृती तेवढी ठणठणीत नसते, तरीही ते स्वतः साडे तीनशे किलोमीटर स्वतः गाडी चालवीत पंढरीत आले आणि महापूजा करून महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्याचे साकडे विठोबास घालून गेले. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्री आले, रस्त्यावर पोलीस आणि दवाखान्यात डॉक्टर राबत आहेत. हे सगळे राज्यातील जनतेसाठीच केले जात आहे. त्यामुळे यात्रा स्थगित करण्यामागची शासनाची भावना जनतेच्याही लक्षात आली. तिने समजून घेतली म्हणून राज्यातील वारकरी घरीच राहिले, पालख्या, दिंड्या यांनी वारी चुकल्याचे दुःख दाबून ठेवले.
कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे, वारीसाठी पालख्या ज्या मार्गाने येतात ते सगळे मार्ग कोरोना बाधित जिल्ह्यातून येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल ही भीती साधार होती. जर यात्रा झालीच असती तर वारकऱ्यांचे माहेर असलेल्या पंढरीत काय परिस्थिती निर्माण झाली असती ? असा सवाल उभा राहतो आहे.
सासवड येथील संत चांगवटेेश्वर देवस्थानची पालखी 20 वाकऱ्यांसह येणार होती, ज्या 20 वारकऱ्यांची परवानगी मागितली होती, त्यापैकी 2 वारकरी तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाले, आळंदीतून माऊलींचा पालखी सोहळा नीरा गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे होती ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह निघाले.
एवढेच नाही तर वारी पोहोच करण्याच्या इराद्याने अगोदरच पंढरीत येऊन बसलेले काही लोक इथं आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दूरदर्शन या सरकारी वाहिनीचे कर्मचारी शासकीय महापूजा प्रक्षेपण करण्यासाठी 29 जून रोजी पंढरपुरात आले होते त्याच पथकातील 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेे यावरून बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कुणाचा संसर्ग किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याची कल्पना येऊ शकते.
यात्रा पूर्णपणे स्थगित करूनही पंढरपूर शहरात कोरोना ची रुग्णसंख्या14 पर्यंत गेली आहे. जर यात्रा परंपरेनुसार भरली असती तर हजारो कोरोना ग्रस्त पॉझिटिव्ह रुग्ण पंढरीत आले असते, आणि हा संसर्ग पुन्हा राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकापर्यंत पोहोचला असता. त्यानंतर राज्यभर कोरोनाचा जो उद्रेक झाला असता त्याला आवर घालणे अगदीच अशक्यप्राय होऊन गेले असते. त्यामुळे मराठी मनाची भावना जरूर दुखावल्या, शेकडो वर्षाची परंपरा निर्दयीपणे खंडित करताना शासनाने प्रशासनाने पुढील महा संकटाचा थोपवले आहे असेच म्हणावे लागेल. आषाढी यात्रा झाली नाही, पंढरीची वारी चुकली पंढरपूरकरांचे शेकडो कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले, हे सगळे वास्तव स्वीकारताना मनाला नक्कीच वेदना होतात. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे हजारो-लाखो जीव संकटात जाण्यापासून वाचले हेसुद्धा खूप मोठे वास्तव स्वीकारावे लागते. आजची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता, पंढरपुरात पसरणारा कोरोना पाहता वारी झाली असती तर काय झाले असते हे भयानक कल्पनाचित्र नजरेसमोर उभा राहते.
आषाढी यात्रा यंदा झाली नाही याच्या दुःखापेक्षा ही यात्रा न झाल्यामुळे सावरलेली परिस्थिती अधिक सुखावह आहे असे म्हणावी लागेल.