पालखी सोहळा प्रातिनिधिक हवा

 

वाखरी ग्रामपंचायतीची आळंदी संस्थानला सूचना

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात मोठा फटका बसलेल्या व सर्व पालख्यांच्या शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आसलेल्या वाखरी  ( ता. पंढरपुर ) ग्रामपंचायतीने  यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रातिनिधीक स्वरूपात साजरा करावा, अन्यथा त्याचा फटका पालखी सोहळ्यातील भाविकांसह ग्रामस्थांना बसू शकतो अशी सूचना केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवले आहे.

            गेल्या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासह पंढरपूर मध्ये भरणाऱ्या प्रमुख चारही प्रमुख यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. यावर्षी तरी पायी वारी होईल अशी अपेक्षा पालखी सोहळा प्रमुख, महाराज मंडळी, काही  व्यापारी, भविकांमधून व्यक्त केली जात होती. मात्र यंदाही गतवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यंदाही आषाढी यात्रेवर आणि पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीना पत्र लिहून त्यांचा अभिप्राय मागवला आहे आणि गावातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली आहे. वाखरी ग्रामपंचायत ने संस्थानला उत्तर देताना यंदाही गत वर्षीप्रमाणे एस टी बस मधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा अशी विनंती केली आहे.

                आता हा संसर्ग कमी होत असला तरी सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यासह वाखरी गाव कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांच्या शेवटचा मुक्काम असतो. दोन वर्षांनी पालखी सोहळे आले तर इथे मोठी गर्दी होऊ शकते. वाखरी गावात जवळपास 800 कोरोनाबधित रुग्ण सापडले होते. तर 30 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 30 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत पायी आषाढी यात्रा सोहळा होणे पालखी सोहळ्यातील भाविक आणि वाखरी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यासाठी धोक्याचे ठरणारे आहे.

  म्हणून गतवर्षी प्रमाणे प्रमुख संतांच्या पालख्या एस टी बसने आणून आषाढी यात्रा सोहळा प्रतिनिधिक स्वरूपात साजरा करावा आणि परंपरा जोपासली जावी अशी सूचना वाखरी ग्रामपंचायतीने प्रशासनासह आळंदी संस्थांनकडे केली आहे. आता प्रशासन, व पालखी सोहळा प्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आषाढी यात्रा सोहळ्याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पायी सोहळ्याबाबत आमचे मत मागितले होते. आमच्या गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. अजूनही रुग्ण आहेत.सध्या बाधित रुग्ण कमी असले तरी परिस्थिती गंभीरच आहे. असे असताना पायी वारकऱ्यांसोबत पालखी सोहळे काढल्यास ग्रामस्थ, सोहळ्यातील भाविकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदा ही मोजक्या पालख्या, त्यामध्ये किमान भाविकाना परवानगी द्यावी. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून, येणाऱ्या पालख्यांना ग्रामपंचायत आवश्यक सर्व सुविधा देईल असे संस्थान ला कळवले आहे.

सौ. कविता तुकाराम पोरे,

सरपंच, ग्रामपंचायत वाखरी, ता. पंढरपुर

Leave a Reply

error: Content is protected !!