मुंबईतील शेतकरी आंदोलनास फॅशन स्ट्रीट दुकानदारांचा पाठिंबा

आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, म्हणत दुकाने बंद ठेऊन आंदोलनास दिला पाठिंबा

आझाद मैदानात शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी चे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते

टीम : ईगल आय मीडिया

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलंय. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेत. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद करण्यात आलीत. फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून, सर्वच स्तरांत हा चर्चेचा विषय ठरत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय. मंत्रालयाकडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. दोन्ही रस्त्यावर पोलिसांची बॅरिकेटिंग आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलाय. शेतकरी राजभवनावर मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांपुढे नियोजनाचं मोठ्ठं आव्हान आहे.

दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याला लागून असलेल्या दुकानदारांना शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, दुकानदारांचा हा निर्णय ऐतिहासिक समजला जातोय. तिन्ही कायदे मोदी सरकारने परत घ्यावेत, आम्हीही शेतकऱ्यांचीच लेकरं आहोत हे कायदे रद्द झालेच पाहिजेत, असा पवित्राही फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानदारांनी घेतलाय.

तसेच या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिलाय. शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सहभागी होणार आहेत. त्यामुळे व्हीआयपी मूव्हमेंट लक्षात घेत एमजी रोडला झिरो ट्रॅफिक रोड म्हणून घोषित करण्यात आलंय. दोन्ही बाजूंना वाहन पार्किंगला सक्त मनाई करण्यात आलीय.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने जिल्हावार मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाला प्रदेश काँग्रेसने जाहीर समर्थन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!