पंढरपूर : ईगल आय न्यूज
आत्महत्येची सुसाईड नोट व्हायरल करून मागील दोन दिवसापासून बेपत्ता झालेली माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा तिसऱ्या दिवशी पोलिसांना शोध लागलेला आहे. सातारा जिल्ह्यातून माळी यांना ताब्यात घेतल्याचे करकंब पोलिसांनी सांगितले. माळी यांना ताब्यात घेऊन पोलीस परत येत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी दिली.
भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बाळासाहेब माळी यांनी सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मी आत्महत्या करीत आहे, माझा शोध घेऊ नका, अशा स्वरूपाची सुसाईड नोट मोबाईलवरून पत्रकार आणि नातेवाईकांना पाठवली होती. त्यानंतर सोमवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून बाळासाहेब माळी यांचा फोन बंद होता आणि ते बेपत्ता असल्याने नातेवाईक त्यांचे शोधाशोध करत होते. माळी यांच्या पत्नी सौ. सुरेखा बाळासाहेब माळी यांनी यासंदर्भात करकंब पोलीस ठाण्यात आपले पती हरवल्याची तक्रार दिली होती.
त्यानुसार करकंब पोलिसांनी माळी यांचा शोध सुरू केला होता.दरम्यान बुधवारी सायंकाळच्या वेळी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गोंदवले येथे गोंदवलेकर महाराज मठासमोर बाळासाहेब माळी यांचा शोध लागल्याचे पोलिसांकडून समजते. माळी यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र बंडू भुईरकर
यांना ताब्यात घेऊन करकंब पोलीस परत येत आहेत. आल्यानंतर त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करू अशी माहिती सपोनी निलेश तारु यांनी दिली.