करकंब पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल
पंढरपूर : eagle eye news
भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि समता परिषदेचे नेते बाळासाहेब माळी यांचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. करकंब पोलीस ठाण्यात माळी यांच्या पत्नीने हरवल्याची तक्रार दाखल केलेली असून पोलीस माळी यांचा शोध घेत आहेत.
बाळासाहेब माळी यांनी सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आपण आत्महत्या करीत आहोत, आपणास शोधण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची सुसाइड नोट त्यांच्या पत्नीस पाठवली आणि सोशल मीडिया व्हायरल केली तसेच पत्रकारांना हि पाठवली होती. त्यावेळपासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असून त्यांचे नातेवाईक आणि पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, मंगळवारी माळी यांच्या पत्नी सौ सुवर्णा माळी यांनी करकंब पोलीस ठाण्यात बाळासाहेब माळी हे सोमवारी रात्रीपासून हरवल्याची तक्रार दिली आहे. माळी यांच्या सोबत बंडू भुईरकर नावाचा त्यांचा मित्र आहेत सौ माळी यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.
माळी यांनी त्यांच्या दत्त पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक तानाजी अर्जुन कोळी ६५आणि त्यांचा पुतण्या प्रदीप माळी यांच्यावर एक कोटी २१ लाख रुपये फसवणुकीचा आरोप केला आहे. तसेच पंपाचा व्यवस्थापक याने आपण तीन खून केल्याची धमकी दिल्याचा हि सुसाईड नोट मध्ये उल्लेख आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोमवारपासून माळी आणि भुईरकर यांचाही फोन बंद आहे. माळी यांचा शोध घेण्यासाठी करकंब पोलीस प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी दिली.