वारकऱ्यांचा बाहेर ठिय्या : भजन आंदोलन सुरू
टीम : ईगल आय मीडिया
आषाढी वारी साठी पायी जाण्याची घोषणा करून आळंदीत आलेल्या हभप बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले आहे. दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्यांसोबत असलेल्या वारकर्यांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. ठिय्या देऊन बसले आहेत आणि भजन गात आहेत. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, सरकारचा हा आदेश झुगारून बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत दाखल झाले होते. याठिकाणहून त्यांनी पायी वारीला सुरुवात केली होती.
पोलिसांनी बंडा तात्यांना शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले होते , आणि संकल्प मंगल कार्यालयात स्थानबद्ध करण्यात आले आहे. आज स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.