बार्डी गावास वादळी वारे आणि पावसाने झोडपले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

बार्डी (ता.पंढरपूर) गावास आज (सोमवार) सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यात द्राक्ष बागा आणि शेडवरील बेदाण्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

आज दिवसभर काहीसे ढगाळ वातावरण असले तरी हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वारे आणि पावसास सुरुवात झाली. मात्र अर्ध्या तासानंतर वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. हे वारे इतके जोरदार होते की अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांबही पडल्यामुळे वीज गायब झाली होती.

काही बेदाणा शेडवरील कागद उडून गेल्याने बेदाण्याचा अक्षरशः चिखल झाला होता. पावसाचा जोरही जास्त असल्याने सखल भागात पाणी साठले होते. विशेष म्हणजे ह्या पाऊस आणि वाऱ्याचा प्रभाव बार्डी आणि जाधववाडीच्या काही भागापूरताच मर्यादित होता.

या अस्मानी संकटात नुकसान झालेल्या शेतीपिकांचे, घरांचे आणि बेदाणा शेडचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बार्डी चे पोलीस पाटील नानासाहेब शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!