जवान सुनील काळे यांना पुलवामा येथे वीरमरण
बार्शी : ईगल आय मीडिया
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दशहतवाद्यांविरोधात लढत असताना बार्शीचे वीर जवान सुनील काळे यांना वीरमरण आले आहे. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून 2 दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बार्शीतील पानगाव येथे ही वार्ता कळताच गाव शोकाकूल झाला असून शहीद सुनिल काळे वर गर्व व्यक्त करीत आहेत.
बार्शी तालुक्यातील पानगावमधील सुनील काळे लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते, घरी दोन लेकरं, आई, पत्नी वाट पाहात होती, पण त्यांनी निवृत्ती न घेता सेवा वाढवून घेतली. बदलीही झाली पण लॉकडाऊनमुळं तिथंच थांबले.
शेतीची मोठी आवड, सारखं फोन करुन मित्रांची काळजी घेणार.
नवीन घर बाधलं, ते अद्याप तिथं राहायलाही गेले नाहीत.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझु येथे मध्यरात्रीनंतर लष्कर, केंद्रिय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त दलाची दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. केंद्रिय राखीव पोलिस दलातील हेडकाॅन्सटेबल सुनिल काळे (पानगाव ता. बार्शी) यांना हौतात्म्य प्राप्त झाले. अतिरेक्यांबरोबरची चकमक आणखी सुरुच आहे. सोमवारी रात्री पुलवामा येथील केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर गोळीबार करुन ग्रेनेड फेकुन दहशतवादी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेताना ही चकमक घडली. सुरक्षा दलाच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून अद्यापही शोध मोहीम सुरू आहे. अनेक दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे.