नव्या विषाणूचा धोका लक्षात घेऊन जागरूक रहा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासकीय यंत्रणेला आवाहन

टीम : ईगल आय मीडिया

इंग्लंड सह इतर काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, धोका लक्षात घेऊन जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

‘करोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा. स्थानिक पातळीवर करोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का, याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्क फोर्सने अभ्यास करावा’, अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा टास्क फोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतानाच नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवीन विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने अधिक दक्ष व्हावे. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवतानाच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विभागीय आयुक्तांनी करोना उपाययोजना आणि लसीकरण कार्यक्रम तयारीची माहिती यावेळी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!