‘पालखी मार्गा’वर परमिट रूम ‘बिअर बार’ना परवानगी !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) गावच्या हद्दीत पालखी मार्गावर स्थानिक नागरिकांचा विरोध झुगारून बिअर बार परमिट रूम ला परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे वाखरी ग्रामपंचायतीने या संदर्भात बोटचेपी भूमिका घेतली असून अगोदर बिअर बार साठी ठराव दिला आणि पुन्हा त्याच्या विरोधात ही ठराव करून या अवैध कामाकडे कानाडोळा केला आहे.

वाखरी हे गाव पालखी मार्गावरील महत्वाचे गाव आहे, दररोज शेकडो वारकरी या मार्गाने आळंदी – पंढरी पायी वारी साठी ये जा करीत असतात. पालखी मार्गावर किमान 10 किमी तरी मांस, मद्य विक्रीसाठी परवानगी देऊ नये, ती दुकाने बंद करावीत अशी मागणी होत असते. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी 10 किमी हद्दीत बिअर बार, दारू विक्री दुकानांना परवाना देऊ नये असे आदेश दिले होते.

आणि त्याची अंमलबजावणी ते पदावर होते तोवर झाली. मात्र त्यानंतर वाखरी ग्रामपंचायतीने ठराव करून गावच्या हद्दीत अनेक बिअर शॉपी ना परवानगी दिली. या बिअर शॉपी रस्त्यालगत उभ्या आहेत. त्यातही वाखरी ते इसबावी विसावा या दाट नागरी वस्तीत बिअर बार ना ग्रामपंचायत ने परवानगी दिली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची तर अडचण झालीच आहे,मात्र स्थानिक नागरिकांनाही याचा त्रास होणार आहे.

विशेष म्हणजे अनेक रहिवाश्यांनी या बिअर बार ना विरोध करीत राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांपर्यंत विनंती अर्ज केले आहेत. तरीही या बिअर बार ना परवानगी दिली गेली आहे. ज्या ठिकाणी हे बार उभा राहत आहेत त्या पालखी मार्गालगत नागरी वस्ती तर आहेच शिवाय दवाखाना, अंगणवाडी केंद्र त्याच्या जवळपास आहेत. तरीही या बार ना परवानगी कशी काय दिली गेली असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बिअर बार ची परवानगी रद्द करावी, पंढरपुर पासून बाजीराव विहीर रिंगण सोहळा स्थळा पर्यंत मांस आणि मद्य विक्रीस पूर्णपणे मनाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!