टीम : ईगल आय मिडिया
बीड-परळी रस्त्यांवर पांगरबावडी येथे वडवणीकडून बीडकडे येणार्या रिक्षाला ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार संध्याकाळी घडली. तबसुम अकबर पठाण, सारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय १३), तम्मना अबजान पठाण (वय १०) मदिना पठाण यांचा या अपघात मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून ते सर्व बीड शहरातील शाहुनगरमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, याच ट्रकचालकाने घोडका राजूरी येथे आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जाते.ट्रक चालक दारू पिलेला होता आणि त्याने याच मार्गावर घोडका राजुरी येथे एका दुचाकीला ठोकरले असून 2 जण जखमी झाले आहेत. पंगरबावडी येथे रिक्षाला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला असून चालक पळून गेला आहे.
बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवणी येथून प्रवाशी रिक्षा बीडकडे प्रवाशी घेवून येत होता. रिक्षा पांगरबावडी जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे जाणार्या ट्रक (क्र.एन. एच. 09 सी.व्ही. 9644) ने रिक्षाला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत जखमींना नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी पाठवले.