स्व. आ. भारत भालके यांच्या जयंती निमित्त निघणार जनसंवाद यात्रा !

भगीरथ भालके गावो – गावी जाऊन साधणार जनतेशी संवाद

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे आ. भारत भालके यांच्या निधनामुळे मतदारसंघ काही महिन्यांपासून पोरका झाला आहे. फेब्रुवारीमध्ये 13 तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो. याच दिनाचे औचित्य साधत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके मतदार संघातील जनतेशी संवाद साधण्यासाठी संवाद यात्रा काढणार आहेत. यात्रेचा शुभारंभ राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. भगीरथ भालके या माध्यमातून पंढरपूर -मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन सर्व सामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत, तसेच भालके यांच्या दुःखद निधन प्रसंगी सहवेदना व्यक्त करीत धीर दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा हेतू या यात्रेचा असल्याचे सांगितले जाते.

आ.भारत भालके यांच्या निधनानंतर अनेकांनी प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील अपूर्ण कामे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे बोलून दाखवले. मतदार संघातील अनेक गोरगरीब माय – माता, बंधू – भगिनी, कष्टकरी शेतकरी यांनी आम्हाला सांत्वन करून मोठा आधार दिला. या त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत जाऊन संवाद साधण्यासाठी यात्रेचे आयोजन केले असे भगीरथ भारत भालके यांनी सांगितले

गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे खोळंबून आहेत, अशा परिस्थितीत देखील आपल्या शरीराची व तब्येतीची काळजी न करता मुंबई येथे अविरतपणे मतदारसंघातील व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कामे मार्गी लावण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती लोकनेते भालके यांनी दिली. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना काळात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असतानादेखील मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांची कामे मार्गी लावावी लागतील या भावनेने, त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले, यामुळे मतदार संघाने एक चांगला नेता गमावला लोकनेते भालके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.


शनिवारी सायंकाळी चार वाजता मंगळवेढ्यातील आठवडा बाजार चौकातून या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळ चे माजी आमदार राजनजी पाटील हे असणार आहेत. तर  आ प्रणितीताई शिंदे, आ संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, आरपीआय कवडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले आदी मान्यवर या जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेेेत.

ही जनसंवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी महाविकासआघाडी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व सहकारी प्रयत्न करत आहेत अशी माहिती भगिरथ भारत भालके यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!