कोरोना काळात विरोधकांनी जनतेवर निवडणूक लादली

स्व.भारत नानांच्या अपूर्ण कामांची पूर्तता करू : भगीरथ भालके

टीम : ईगल आय मीडिया

2019 साली मतदारसंघातील जनतेने भारत नानांना 5 वर्षांकरिता निवडून दिले होते. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले, त्यानंतर होणारी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र कोरोना काळाची परिस्थिती लक्षात न घेता विरोधकांनी ही निवडणूक जनतेवर लादली आहे. भारत नानांची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी the eagle eye शी बोलताना केले.


यावेळी पुढे बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, 2009 साला पासून या मतदारसंघात भारत नानांनी सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केले, त्यांच्या अडी अडचणीत मदतीला गेले, सार्वजनिक कामे केली. फुटपाथवर बसणाऱ्या वेक्रेत्यापासून ते मॉल मधील मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना त्यानी सुरक्षितता आणि विश्वास दिला होता. शहरातील विकास कामांचा पाठपुरावा करीत असतानाच नागरिकांना भयमुक्त जगता यावे यासाठी कधीही गुंडगिरी ला थारा दिला नाही.

गेल्या 11 वर्षात पंढरपूर शहर एक विकसित होत असलेले, शांत, कायदा सुव्यवस्था असलेले तीर्थक्षेत्र ही ओळख निर्माण करून होतं. भारत नानांच्या निधनानंतर अनेक व्यापारी बंधूनी पुढच्या काळात पुन्हा अशांतता डोके वर काढण्याची भीती बोलून दाखवली आहे. मात्र मी नानांचा वारसदार म्हणून शहरातील कायदा, सुव्यवस्था, किरकोळ विक्रेते, व्यापारी, सेवा देणाऱ्या वर्गाचे हित जपण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन.


पंढरपूर शहराला कर्मवीर औदुंबर अण्णा, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, भारत नाना यांची परंपरा आहे. जनता भांडवल दार आणि आपल्या ठेकेदारीचे हित पाहणारा, शहराचा इतिहास, परंपरा यांचा कसलाही संबंध नसलेला, शहराच्या प्रश्नांची जाण नसलेला उमेदवार स्वीकारणार नाही याचा विश्वास आहे.

केवळ निवडणूक आली की अर्ज भरणाऱ्या आणि एरवी संकटकाळी जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या उमेदवारास जनता स्वीकारणार नाही. आजारी असतानाही भारत नाना कोरोना काळात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवसरात्र फिरत होते, महापूर काळात काम करीत होते, तेव्हा हे उमेदवार कुठं दिसले नाहीत. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील लोकांचे प्रश्न, अडचणी याना माहीत नाहीत, यांनी कधी एखाद्या प्रश्नावर 2 ओळींचे निवेदन दिले नाही की, 10 मिनिटे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. आज 35 गावचा पाणी प्रश्न सोडवू म्हणतात मग 5 वर्षे फडणवीस सरकार असताना यांनी यासाठी काय केलं ते दाखवावं असे आव्हान भगीरथ भालके यांनी दिले.

पंढरपूर तालुक्यातील उजनी, नीरा उजवा कालवा, तिसंगी तलाव याच्या पाण्यासाठी मी सतत जागृत राहीन, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजनेसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तालुक्यात रस्ते, वीज, पिण्याचे आणि शेतीचे पाणी या प्रश्नावर एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करेन. सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, युवक, युवतींना चांगल्या रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी midc सारखा प्रकल्प मंजूर करून घेण्याला माझे प्राधान्य असेल.


या निवडणुकीत माझ्यासोबत सर्व सामान्य जनता आहे, माझ्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभा आहे, डोक्यावर नानांची पुण्याई आणि जनतेचा आशीर्वाद रूपी हात आहे, त्यामुळे समोरचे दोन पैसेवाले एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. जनतेच्या कृपेने मीच विजयी होणार आहे. आणि जनतेला दिलेल्या शब्दांशी बांधील राहून काम करणार आहे असे ही यावेळी भगीरथ भालके म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!