भाजप मालामाल : 2555 कोटींचा पक्ष निधी

प्रादेशिक पक्षात टी आर एस पहिल्या तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

टीम : ईगल आय मीडिया

२०१९-२० या वर्षामध्ये विक्री करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या एक तृतीयांश निधीवर भाजपा मिळाला आहे. २०१९-२० या वर्षासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीपैकी तब्बल ७४ टक्के निधी एकट्या भाजपला मिळाला आहे. २०१९-२० या काळात एकूण विक्री झालेल्या ३४२७ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी भाजपाला ७४ टक्के म्हणजे २५५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. तर केवळ ९ टक्के निधी हा काँग्रेसला मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉन्ड) वापरले जातात. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने २०१९-२० या काळात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या प्रादेशिक पक्षाला किती प्रमाणात निधी मिळाला आहे याची माहिती दिली आहे.

पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, २०१९-२० मध्ये देशभरातील ४२ प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ८७७.९५७ कोटी रुपये होते. प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.  अहवालानुसार, टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए या १४ पक्षांनी निवडणूक रोख्यांमधून देणगी जाहीर केली.

शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी २०१९-२० मध्ये ४४७.४९ कोटी रुपयांच्या देणग्या निवडणूक बॉण्डद्वारे प्राप्त करण्याची घोषणा केली आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस १३०.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह अव्वल आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या १४.८६ टक्के इतकी आहे. शिवसेनेला १११.४०३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर वायएसआर- काँग्रेसने ९२.७३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

२०१९-२० या काळात एकूण विक्री झालेल्या ३४२७ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी भाजपाला ७४ टक्के म्हणजे २५५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. सन २०१७-१८ साली भाजपाला २१० कोटी रुपये मिळाले होते. त्यात आता तब्बल दहा पटीने वाढ होऊन २५५५ कोटी रुपये मिळाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!